Saturday, November 8, 2008

वैद्यकीय माहितीतंत्रज्ञान

जीववैद्यकीय माहितीतंत्रज्ञान

अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने मला शिष्यवृत्ती दिली आणि मी बॉस्टनजवळच्या वूड्स होल या गावातील समुद्री व जीवशास्त्रीय प्रयोगशाळेच्या कार्यशाळेत प्रशिक्षण घेऊन आलो. त्यानंतर वृत्तपत्रांमधे येत असलेल्या बातम्या वाचून परिचितांचे दूरध्वनी येऊ लागले आणि लोक विचारू लागले की "नेमके कसले प्रशिक्षण आणि त्यासाठी तुझी निवड कशी झाली?" मी घरात नसताना दूरध्वनी घेणार्‍या माझ्या वडिलांनाही या प्रश्नाचे उत्तर देता येईना, तेंव्हा त्यांनी सुचवले, " अरे एखादा लेख लिही या विषयावर." म्हणून हा लेखन प्रपंच..!!
बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जीवशास्त्रीय प्रक्रीया वापरून निरनिराळी उत्पादने तयार करणे, बायोमेडिकल इंजिनिअरिंग म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात वापरल्या जाणार्‍या यंत्रसामुग्रीविषयीची शाखा उदा. सोनोग्राफी, एम आर आय इत्यादी. बायोइन्फॉरमॅटिक्स म्हणजे जनुकांच्या आराखड्याच्या माहितीचे संगणकीकृत विश्लेषण आणि मेडिकल इनफॉरमॅटिक्स म्हणजे वैद्यकीय माहितीचे संगणकाच्या सहाय्याने केलेले एकत्रीकरण व पृथ:करण. बायोमेडिकल इन्फॉरमॅटिक्स म्हणजे जनुकीय अथवा इतर कारणांनी होणार्‍या निरनिराळ्या आजारांसंबंधी, त्यांच्या उपचारांसंबंधी आणि त्यांच्या प्रतिबंधासाठी केल्या जाणार्‍या उपाययोजनांसंबंधी माहिती संगणकात साठवून त्याच्या पृथ:करणातून जनतेच्या स्वास्थ्यामधे सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणे. वरवर पहाता वाटणारा हा गुंता एखाद्या उदाहरणाने सोडवता येतो का ते पाहू.
साथीच्या आजारात बहुतांशवेळा मुलांना ताप येतो. आधी आपण त्यांना घरगुती औषध देतो, शाळेत पाठवत नाही. मग काही लोक मेडिकल स्टोअर्समधून तापाचे औषध आणतात. तरीही बरे न वाटल्यास त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे नेतात. त्यांच्या औषधांनीही बरे न वाटल्यास रक्त, एक्सरे वगैरे तपासण्या होतात. बालरोगतज्ञाची मदत घेतली जाते. न्युमोनियाचे निदान होऊन रुग्णालयात दाखल करेस्तोपर्यंत आजार खूप बळावलेला असतो. शेवटी अतिदक्षता विभागात ठेवूनही रुग्ण दगावतो. एखाद्या रुग्णालयात असे पाच सहा रुग्ण दगावले की न्युमोनियाच्या साथीची जाणीव होते आणि प्रतिबंधात्मक उपाय सुरु केले जातात, पण तोपर्यंत आजाराने अनेक रुग्णांना आपल्या कवेत घेतलेले असते. याचप्रमाणे अतिसार, मलेरिया, डेंग्यु अशा अनेक आजारांच्या साथींनी गंभीर स्वरूप दाखल करण्याच्या आधी त्यांच्याबद्द्ल माहिती कशी गोळा करता येते ते पाहू.
आता असा विचार करूया की संगणकाच्या महाजालाला घरे, शाळा, वैद्यकीय दुकाने, दवाखाने, लॅबोरेटरीज, क्ष किरण आणि तज्ञ डॉक्टर, रुग्णालये, अतिदक्षता विभाग जोडलेले आहेत. सर्व मुलांची नावे व पत्ते वेबसाईटवर आहेत. मुलाला जुलाब, खोकल, ताप आल्याबरोबर पालकांनी तशी नोंद केली तर निरनिराळ्या पेठांमधील किती मुलांना ताप आहे हे आरोग्य विभागाला कळेल. ज्या विभागात नेहमीच्या प्रमाणापेक्षा जास्त रुग्ण आढळतील तिथे प्रतिबंधात्मक कारवाई सुरु होईल. शाळांमधे गैरहजर राहणार्‍या मुलांची नोंद शाळा करतील आणि सणवार अथवा क्रिकेटची मॅच नसेल तर बहुदा मुलगा आजारी असेल. आपापल्या दुकानांतून विकल्या जाणार्‍या औषधांची नोंद दुकानदार करतील आणि कुठल्या प्रकारच्या औषधांची विक्री वाढली त्याकडे लक्ष ठेवता येईल. आपल्याकडे येणार्‍या रुग्णांच्या निदानाची नोंद फॅमिली डॉक्टर करतील आणि तज्ञ डॉक्टर्स त्यांच्या कडे येणार्‍यांबद्द्ल माहिती देतील. लॅबोरेटरीज व प्रयोगशाळा त्यांच्या निदानांची माहिती नोंदवतील तर रुग्णालयात दाखल होणार्‍या सर्वांची माहिती आणि अतिदक्षता विभागात येणार्‍या सर्वांबद्द्ल सूचना आरोग्यखात्याला रोजच्या रोज मिळत राहील. रुग्णालयातून बाहेर पडतानाच्या रोगनिदानाची नोंद संगणकावर होईल. या सर्व माहितीचे सातत्याने विश्लेषण करत राहिल्यास साथीने रुग्णावर मात करण्यापूर्वी आपण साथीवर मात करु शकू..!! या माहितीतून तयार होणार्‍या नकाशांच्या सहाय्याने साथ कशी पसरते ते कळेल.
विद्यार्थी इंटरनेटचा वापर खेळासाठी सुद्धा करतात, बहुतेक शाळांमधे संगणक शिक्षण दिले जाते आणि शाळांना हजेरीपट लिहावाच लागतो , मेडिकल स्टोअर्स संगणकावर बिले छापतात, फॅमिली डॉक्टरांना बाह्यरुग्ण रजिस्टर लिहावेच लागते, हॉस्पिटल्सना दाखल केलेल्या रुग्णांची नोंद करावीच लागते आणि मृत्युदाखल्यातही रोगनिदान लिहावे लागते. त्याचप्रमाणे ऑफिसेस व कंपन्यांमधून काम करणार्‍या नागरिकांची आरोग्यविषयक माहिती व्यावसायिकांना ठेवावीच लागते. संगणक अभियंत्याच्या दृष्टीने या माहीतीचे एकत्रीकरण करणे ही फार सोपी गोष्ट आहे. पुणे शहरातील, जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील संगणकांचे जाळे असे वापरले तर देशाचे आरोग्य सुधारण्यास खूप मदत होईल. हे फार मोठे स्वप्न आहे. प्रगत देश या स्वप्नाच्या पूर्तीजवळ पोचले आहेत. आता ते इतर देशांमधून त्यांच्याकडे येऊ शकणार्‍या साथींच्या प्रतिबंधासाठी संगणकाचे जाळे पसरवण्याच्या प्रयत्नात आहेत.
वैद्यकीय व्यावसायिकांच्या दृष्टीने अश्या प्रकारे माहिती एकत्र करण्यात अनेक अडचणी आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे माहितीची गोपनीयता. परन्तु संगणक प्रणाली ही अडचण सोडवू शकतात. दुसरी अडचण म्हणजे वैद्यकीय परिभाषा. त्यासाठी व्यावसायिकांनी संगणकात माहिती साठवताना काही प्रमाणभूत संज्ञांचा वापर करायला हवा. सामान्य व्यक्तींना समजण्यासाठी दोन उदाहरणे देतो. ४१ वर्षाची महिला, २० वर्षाची युवती, १२ वर्षाची मुलगी असा उल्लेख न करता लिंग : स्त्री, वय : ... अशी नोंद करावी. संगणकाला हे सर्व एकच आहेत असे कळत नाही तर काय करायचे? याच प्रमाणे DM, MODY, Type1, Type2 हे सर्व DIABETES MELLITUS ऐवजी लिहिले जात असल्यामुळे संगणक गोंधळू शकतो. यासाठी अनेक संस्थांनी पारिभाषिक शब्दांची अधिकृत सूची तयार केली. सुमारे २०० याद्या तयार झाल्यामुळे गोंधळ अजूनच वाढला. अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनने यातील महत्वाच्या याद्यांचे एकत्रीकरण करून वैद्यकीय भाषेचा कोष तयार केला आहे. सर्वांनी हा कोष वापरावा असा त्यांचा आग्रह असला तरीही त्याच्या वापरात अनेक अडचणी आहेत. अनेक याद्या एकत्र केल्यामुळे काही संज्ञा पुन्हा पुन्हा येतात. लक्षाविधी संज्ञांमधून हजारो कल्पना किंवा अर्थ शोधता शोधता संगणकाचीसुद्धा दमछाक होते. शिवाय या यादीत एखादी नवीन संज्ञा घालायची म्हणजे द्राविडी प्राणायाम. म्हणून लोक या कोषापासून दूर पळतात.
१९९७ सालापासून वैद्यकीय माहिती साठवण्यासाठी मी संगणकप्रणाली विकसित करत आहे. यासाठी मला या विषयातील प्रशिक्षणात रस होता. परंतू भारतात याविषयी शिक्षण देणारी संस्था मला सापडली नाही. या दरम्यान पारिभाषिक कोषाच्या संदर्भात मी काही काम केलेले असल्याने अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन कडे २००४, २००६ व २००८ या तीन वर्षी अर्ज केला. २००४ मधे मला नकार मिळाला. पुढील दोन वर्षांमधे मी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेसाठी (NIV) साठी संगणक प्रणाली विकसित केली आणि २००६ साली मला प्रशिक्षणासाठी प्रतिक्षायादीत जागा मिळाली..!! २००७ साली मी मुंब ईतील एका नगरपरिषदेचे रुणालय आणि त्याहद्दीतील १० दवाखाने यांना जोडण्यासाठी माहितीच्या मायाजालाचा वापर करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले पण ते प्रकरण बारगळले. २००८ च्या माझ्या अर्जाचा विचार होऊन माझी बायोमेडिकल इनफॉरमॅटिक्समधील प्रशिक्षणासाठी निवड होण्यात या वैद्यकीय केंद्रे जोडण्याच्या प्रात्यक्षिकाच्या माहितीचा फार मोठा हातभार होता हे मला अमेरिकेला गेल्यावर कळले. एका रुग्णाला त्याच्या हयातीत अनेक आजार होतात व तो अनेक तज्ञांकडे व प्रयोगशाळांमधे जातो. माझ्या मते त्याची सर्व माहिती एकाच संगणक प्रणालीत ठेवता यायला हवी. अश्या अनेक रुग्णांच्या अनेक आजारांच्या अनेक तज्ञांनी साठवलेल्या माहितीचे विश्लेषण केल्यास वैद्यकीय संशोधनला मदत होईल अशी कल्पना करून सर्व वैद्यकीय शाखा व उपशाखांमधील सर्व प्रकारच्या तपासण्यांची व उपचारांची माहिती एकत्रित करण्यासाठी मी संगणकप्रणाली तयार केली आहे. तिचे प्रात्यक्षिक बघितल्यावर अमेरिकेत या क्षेत्रात गेली ३०-४० वर्षे काम करणार्‍या तज्ञ प्राध्यापकांनी माझी पाठ थोपटली तेंव्हा माझा आत्मविश्वास दुणावला.
अर्थात नुसती संगणक प्रणाली केली म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. तज्ञ डॉक्टरांपासून ते वैद्यकीय विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना संगणकात माहिती ठेवून त्याचे विश्लेषण करण्याचा उपयोग सांगायला हवा. त्यांची संगणकाविषयीची अनास्था / भीती जाऊन त्यांना त्यामधे रस निर्माण व्हायला हवा. त्यांना प्रशिक्षण द्यायला हवे. "जीववैद्यकीय माहितीतंत्रज्ञान" या विषयाची ओळख करून देण्यासाठी बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रिसर्च सोसायटीने नुकतेच एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामधे ४० अध्यापक, २० निवासी डॉक्टर्स आणि २० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. ५ दिवस चाललेल्या या कार्यशाळेमधे मी या क्षेत्रातील निरनिराळे कोष, माहितीचे संकलन, माहितीचे विश्लेषण, माहितीचे मायाजाल, टेलिमेडिसिन, संगणकाचा निर्णय घेण्यासाठी उपयोग अशा विविध विषयांवर व्याख्याने व प्रात्यक्षिके दिली. अशाच प्रकारच्या कार्यशाळा माहिती तंत्रज्ञानाचे विद्यार्थी, संगणकप्रणाली विकसित करणारे अभियंते, मोठी रुग्णालये आणि आरोग्ययंत्रणा चालवणारे अधिकारी, आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या सामाजिक संस्थांमधील स्वयंसेवक आणि अहोरात्र रुग्णसेवेत कार्यरत असलेले सेवक, परिचारिका आणि वैद्यकीय व्यावसायिक यांच्यासाठी आयोजित करायला हव्यात.
या कार्यशाळेच्या अखेरीस विद्यार्थ्यांच्या हातात प्रशस्तीपत्रके देताना नव्या दमाचे खेळाडू या मैदानात येत असल्याची चाहूल मला लागत आहे. ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिकांनी या तरुणाईला साथ दिल्यास, विविध तज्ञांनी माहितीचे आदानप्रदान करण्याची तयारी दाखवल्यास, रुग्णालयांनी माहितीचे एकत्रिकरण केल्यास आणि राजकीय पुढार्‍यांनी वैद्यकीय माहितीतंत्राज्ञानात पुढाकार घेतल्यास आपण भरीव कामगिरी करु शकू. जगाच्या १६% लोकसंख्या असणारा भारत वैद्यकीय संशोधनात पिछाडीला का असा प्रश्न अमेरिकेतील प्राध्यापकांनी मला विचारला. सर्व जगातून येणार्‍या वैद्यकीय पर्यटकांवर उपचार करणार्‍या भारतीय वैद्यकीय व्यावसायिकांनी आणि जगाला गवसणी घालणार्‍या भारतीय संगणक अभियंत्यांनी एकत्र येऊन या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. पुण्याच्या कमिन्स विमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विद्यार्थिनी बी. जे. महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थींच्या प्रकल्पांसाठी मदत करणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधे अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित करण्याची विनंती मी वैद्यकीय शिक्षण व संशोधन खात्याला केली आहे.
रुग्णांची संख्या आणि उपलब्ध सोयी यांचा विचार करता साधारणपणे २०% रुग्णांना सरकारी दवाखाने व रुग्णालयांमधे उपचार मिळतात तर जवळपास ८०% रुग्ण खाजगी दवाखाने आणि रुग्णालयांमधे औषधोपचार घेतात. म्हणूनच अशा प्रकारे माहिती गोळा करण्यासंबंधीच्या प्रकल्पांमधे खाजगी दवाखाने, रुग्णालयांमधे काम करणार्‍या वैद्यकीय व्यावसायिकांना सहभागी होण्यामधे काय अडचणी येऊ शकतात, त्यावर उपाय शोधल्यास काय फायदे होऊ शकतात याबाबात चर्चा होणे गरजेचे आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या सामाजिक संस्था आणि संशोधन करणारे व्यावसायिक यांना निरनिराळ्या प्रकारची माहिती कोठून मिळते, त्यामधे काय अडचणी येतात, संगणकाचा वापर करून त्या कशा सोडवता येतील या बद्दल माहिती दिल्यास उपयोग होईल. वैद्यकीय व्यावसायिकांसाठी संगणक प्रणाली निर्माण करणार्‍या अभियंत्यांनी अशा प्रकल्पात काय अडचणी येऊ शकतात आणि त्या कशा सोडवता येतील याबद्दल वैचारिक देवाणघेवाण करायला हरकत नाही. महानगरपालिकेचे दवाखाने व रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि सरकारी हॉस्पिटल्समधे काम करणार्‍या निरनिराळ्या खात्यातील सेवकांनीही आपल्या प्रतिक्रिया कळवल्यास त्यांचा एकत्रितपणे विचार करता येईल. सकाळकडे प्रतिक्रिया पाठवताना "जीववैद्यकीय माहितीतंत्रज्ञान" असा उल्लेख लिफाफ्यावर करावा ही विनंती.

No comments: